साधनांचे प्रकार

मराठेशाहीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला लिखित, भौतिक व मौखिक साधनांचा वापर करता येतो. ह्या साधनांची सत्यता व विश्वसनीयता लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठेशाहीतील काही ताम्रपट, नाणी इत्यादी ही उपलब्ध आहेत. काही लेखकांनी मौखिक स्वरूपातील माहितीही कालांतराने लिहून ठेवल्याने ती उपलब्ध आहे. पण या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले साधन म्हणजे लिखित साधने. सर्वसामान्यपणे ह्या साधनांचे वर्गीकरण खालील प्रमाणे करता यईल -

सार्वजनिक कागदपत्रे
यात शासकीय कार्यालयातून पाठवलेला सार्वजनिक स्वरूपाचा पत्रव्यवहार आणि दस्तऐवज म्हणजे महसूल किंवा जमीनीसंदर्भातली पत्रे, संस्थेची दानपत्रे, फर्माने, न्यायनिवाडे, पंचायतीचे निवाडे इत्यादीचा समावेश होतो. बादशाहांच्या किंवा त्यांचे सरदार, वतनदार इत्यादींच्या कार्यालयात किंवा दफ्तरात नोंदविलेल्या गोष्टी व आंतरकार्यालयीन पत्रव्यवहार सुद्धा ह्या प्रकारात येतो. ह्या प्रकाराचे वैशिष्ठ्य म्हणजे लोकांना इतिहास कळावा म्हणून ही साधने तयार होत नाहीत तर दैनंदिन कामकाजानिमित्त त्यांची निर्मिती झालेली असते.

ऐतिहासिक नोंदी
सरकारी कागदपत्रे पाहण्याची संधी मिळालेल्या किंवा सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींचे ऐतिहासिक लिखाण या प्रकारात मोडते. यात दरबारातील नोंदी, शकावल्या, अधिकृत चरित्रे, सरकारी पत्रव्यवहारांचे संकलन इत्यादी गोष्टी येतात. लोकांना इतिहास कळावा या भूमिकेतून असा साधनांची निर्मिती झालेली असते.

वैयक्तिक नोंदी
एखाद्या व्यक्तीने स्वतःपुरत्या केलेल्या नोंदी, रोजनिशी, प्रवास वर्णने इत्यादी गोष्टी या प्रकारात समाविष्ट होतात.

ऐतिहासिक साहित्य
ज्यात शंभर टक्के इतिहास नाही पण ज्यात इतिहासाचा अंश गुंफला आहे अशा प्रकारचे लेखन साहित्य या प्रकारात मोडते. यात पोवाडे, कविता, नाट्य ज्यात इतिहासाचा अंश आहे असे इतरही प्रकारचे साहित्य येते. अनधिकृत चरित्रेही या प्रकारात येतात.सत्यासत्यता

एखादे पत्र जेव्हा सांगते की ते एका विशिष्ट व्यक्तीने लिहिले आहे किंवा दुसऱ्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून त्या व्यक्तीसाठी लिहिले आहे आणि जेव्हा ते तसेच असल्याचे दिसते तेव्हा ते खरे मानले जाते. काही कारणास्तव जर एखाद्याने एक पत्र तयार केले जेणेकरून ते शिवाजीने लिहिले असल्याचे वाटेल, किंवा शिवाजीच्या पत्रात फेरफार करून स्वतःला हवा तो मजकूर घातला तर असे पत्र बनावट समजले जाते. कागदपत्राची सत्यता निश्चित करताना एक लक्षात घेतले पाहिजे की त्या पत्राची सत्यता व त्यातील माहितीची सत्यता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

मुळात दोन प्रकारची पत्रे खरी मानली जातात, एक अस्सल आणि दुसरी नक्कल. नक्कलचा अर्थ नकली असा नसून मूळ पत्राची केलेली नक्कल इतकाच आहे. ह्यातील अस्सल पत्र म्हणजे ज्यावर पाठविणाऱ्या अधिकाऱ्याचा सही शिक्का आहे. नक्कल म्हणजे त्या मूळ पत्रावरून नंतर कधीतरी केलेली त्याची प्रत. अशा प्रती सुद्धा दोन प्रकारच्या असू शकतात. एक म्हणजे मूळ पत्र लिहिणाऱ्याने केलेली प्रत व दुसऱ्या कोणीतरी नंतर बनवलेली प्रत. दुसऱ्या कोणीतरी केलेल्यात हाताने लिहिलेली किंवा बऱ्याच नंतर केलेली कार्बन प्रत असू शकतात. कार्बन प्रतीमध्ये मूळ पत्राचा कागद व शाई वगळता इतर वैशिष्ठ्ये बऱ्याच अंशी तशीच राहतात.

प्रती बनवताना त्यात काही चुका उतरू शकतात. त्यामुळे त्यातील माहितीत जरी काही दोष आले तरी त्याने पत्राच्या सत्यतेवर परीणाम होत नाही. कागदपत्रांची सत्यासत्यता ठरवण्यासाठी खालील बाबींचा उपयोग होतो -
अ. कागद व शाई
आ. सही शिक्का
इ. लेखनपद्धती
ई. दिनांक
उ. भाषा व लिपी
ऊ. हस्ताक्षर
ए. ऐतिहासिक माहिती
ऐ. इतर साधनांशी साधर्म्य

साधनांच्या सत्यासत्यतेविषयी अधिक माहितीसाठी गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या श्री राजा शिवछत्रपती पुस्तकातील खंड १ भाग २ परिशिष्ट १ आवश्य पाहावे.साधनाचा काळ

ऐतिहासिक साधनांना समकालीन व उत्तरकालीन अशा गटातही विभागता येते, ज्यापैकी समकालीन साधन हे बहुतांशी अधिक विश्वसनीय मानले जाते. ही विभागणी मुख्यतः कागदपत्राचा काळ व त्यातील घटनेचा काळ यावर आधारित असते.

उदाहरणार्थ सन १७४० मधील एखादे कागदपत्र जर सन १६८० मधील एका घटनेचा उल्लेख करत असेल तर त्या संदर्भात ते कागदपत्र उत्तरकालीन ठरते. पण जर सन १६८० मधील किंवा त्याच्या जवळपासचे कागदपत्र त्या घटनेचा उल्लेख करत असेल तर ते समकालीन व त्यामुळे अधिक विश्वसनीय ठरते.

कागदपत्राच्या लेखकावरूनही त्याचे समकालीनत्व ठरविले जाऊ शकते. उदाहरणार्थ सन १६८० मधील घटना स्वतः पाहिलेल्या एखाद्याने त्यानंतर ५० वर्षांनी, म्हणजे सन १७३० मध्ये त्याबद्दल लिहून ठेवले तरी ते साधन समकालीन ठरते.

उत्तरकालीन साधनांची विश्वसनीयता जरी समकालीन साधनांपेक्षा कमी असली तरी त्यातून काही वैशिष्ठ्यपूर्ण माहिती पुढे येऊ शकते. विशेषकरून एका पिढी कडून पुढच्या पिढीकडे आलेल्या मौखिक परंपरांच्या बाबतीत हे खरे आहे कारण कालांतराने त्या कोणाकडून तरी लिहिल्या जातात.विश्वसनीयता

एखाद्या कागदपत्राची विश्वसनीयता तीन गोष्टींवर अवलंबून असते -
अ. साधन प्रकार
आ. सत्यासत्यता
इ. साधनाचा काळ

आधी दिलेल्या साधन प्रकारात, सार्वजनिक कागदपत्रे ही साधारणपणे अधिक विश्वसनीय मानली जातात, विशेषकरून समकालीन असणारी. म्हणजेच अशी कागदपत्रे ही प्रथम दर्जाची मानली जातात. ऐतिहासिक व वैयक्तिक नोंदी या लेखकाच्या किंवा त्याच्याकडून ते लिहून घेणाऱ्या व्यक्तीच्या सापेक्षतेला अनुसरून असू शकतात. त्यामुळे अशा नोंदींना दुसऱ्या दर्जाचे साधन मानले जाते. ऐतिहासिक साहित्य हे साधारणपणे तिसऱ्या दर्जाचे साधन मानले जाते कारण त्यात जरी ऐतिहासिक अंश असला तरी त्याचा कल हा सर्जनशीलतेकडे असतो. पण त्यातूनही ऐतिहासिकदृष्ट्या लक्षवेधी गोष्टी मिळू शकतात.

साधारणपणे, पहिल्या दर्जाच्या साधनाचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाच्या साधनाशी मेळ बसत नसेल तर पहिल्या दर्जाचे साधन ग्राह्य मानले जाते. पण जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाच्या साधनाची पुष्टी करण्याकरता पहिल्या दर्जाचे साधन उपलब्ध नसेल तर अशा अभावामुळे दुसऱ्या वा तिसऱ्या दर्जाचे साधन टाकाऊ होत नाही. ज्या घटनांची पुष्टी करण्यास पहिल्या दर्जाची साधने उपलब्ध नसतात अशा अनेक घटना प्रकाशात आणण्यास दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाच्या साधनांचा उपयोग होतो.

साधनाची सत्यासत्यता ही अलिकडील पानावर दिलेल्या माहितीवरून ठरवता येते. ह्यात जर योग्य मापदंड लावून तपासणी केली तर ते साधन खरे आहे किंवा खोटे हे ठरवता येते. त्यात अनिश्चितीची शक्यता कमी असते.

साधारणपणे एखादे समकालीन साधन हे उत्तरकालीन साधनापेक्षा अधिक विश्वसनीय मानले जाते. पण विशिष्ट साधनांची विश्वसनीयता पाहताना त्याचा साधन प्रकारही महत्त्वाचा ठरतो.भाषा-लिपी

ही साधने अनेक भारतीय व अभारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत ज्यामुळे त्याचे भाषांतर, संकलन इत्यादी गोष्टी अधिकच क्लिष्ट होतात. ह्या सर्व भाषांमधील उपलब्ध साधने पाहिली तर या विषयाची व त्याच्या अभ्यासाची जटिलता लक्षात येते. भाषांवर आधारित साधनांची विभागणी खालील प्रकारे करता येते -

भारतीय भाषा - संस्कृत, मराठी, हिंदी, कानडी, तमिळ, बंगाली, राजस्थानी
अभारतीय भाषा - इंग्रजी, वलंदेजी, पोर्तुगीज, फ्रेंच, फार्सी

या भाषांव्यतिरिक्त चार प्रमुख लिपी या साधनांमध्ये वापरल्या जातात. त्या आहेत - मोडी, रोमन, फार्सी व देवनागरी. बहुतेक साधने ही मोडी व फार्सी लिपीत सापडतात पण परदेशी लोकांची साधने रोमन लिपीत आहेत.