मध्ययुगीन कालमापन

मध्ययुगीन भारतात प्रामुख्याने हिंदू, इस्लामी व रोमन ह्या कालमापन पद्धती वापरल्या जात होत्या. रोमन पद्धतच पुढे ख्रिस्ती लोकांनी वापरली. ह्या सर्व पद्धती एकाच वेळेला अनेक कागदपत्रांमध्ये व प्रांतात वापरल्या जात होत्या.

बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कालमापन पद्धती एकाच राज्यात वेगळ्या कारणांसाठी वापरल्या जात होत्या. अनेक राजेमहाराजे स्वतःचा राज्याभिषेक संवत सुरू करत.

ह्या सगळ्यामुळे घटनांचा नेमका दिनांक काढताना व इतर घटनांशी त्याचा संबंध लावताना काळजी घ्यावी लागते.

ज्यूलियन आणि ग्रेगोरीयन पद्धतींमधील दिनांक गणितासाठी ह्या संकेतस्थळाला आवश्य भेट द्या.

आता आपण विविध कालगणना पद्धतींची थोडक्यात माहिती घेऊया.थोडक्यात ओळख

रोमन कालगणनेत ज्यूलियन (जुनी पद्धत) व ग्रेगोरीयन (नवीन पद्धत) ह्या पद्धती येतात. सोळाव्या शतकात पोप ग्रेगरी याने नवीन पद्धत मांडली. दोन्ही पद्धती सौर वर्षावर आधारीत आहेत.

हिंदू कालगणनेत प्रामुख्याने शक संवत, विक्रम संवत, त्यांच्यातील स्थानिक पातळीवरील वैविध्य व राज्याभिषेक शक अशा पद्धती येतात. ह्या पद्धतीत सौर व चांद्र दशांचे मिश्रण केलेले दिसते.

इस्लामी कालगणनेत हिजरी, शुहूर, इलाही, फसली, जुलूस व तुर्की पद्धती येतात. हिजरी ही चांद्रदशेवर आधारीत पद्धत आहे तर इतर काहीत सौर पद्धती होत्या. जुलूस पद्धती एखाद्या राजाच्या राज्यरोहणापासून मोजली जायची त्यामुळे ती राज्याभिषेक शकासारखी म्हणता येईल.

ह्या सगळ्या पद्धतींमध्ये अनेक स्थानिक वैशिष्ठ्ये ही होती. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासकांसाठी कालनिश्चितीचे काम अधिकच किचकट होत गेले.हिंदू संवत

शक संवत दक्षिण भारतात अधिक प्रमाणात वापरला जात होता. सामान्य काळाच्या (CE) ७८ व्या वर्षात त्याची सुरूवात झाली. ह्या शकाचे एक स्थानिक वैविध्य म्हणजे महाराष्ट्रात याचे पूर्ण झालेले वर्ष मोजले जाते तर तमिळनाडू मध्ये चालू वर्ष धरले जाते. म्हणजे महाराष्ट्रातील शक १५५१ हे तमिळनाडू मध्ये शक १५५२ असे लिहिले जाईल.

त्यात आणखी असे की ह्या काळगणनेत उत्तरेतील महिने पौर्णिमांत असतात तर दक्षिणेतील महिने अमांत असतात. पौर्णिमांत म्हणजे पौर्णिमेला संपणारे व अमांत म्हणजे अमावास्येला संपणारे महिने.

विक्रम संवत हे सामान्य काळ सुरू होण्यापूर्वी ५८ व्या वर्षी सुरू झाले. ही काळगणना उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जाते व नेपाळ सारख्या राष्ट्रांमध्ये ही सरकारी काळमापन पद्धत आहे.इस्लामी कालगणना

हिजरी सनाची (AH) सुरूवात प्रेशित मुहम्मदाच्या मक्केहून मदिनेकडे केलेल्या पलायनाने झाली. दुसरा खलीफ ओमर याने सा.का. ६३९, म्हणजे हिजरी वर्ष १७ मध्ये ही सुरू केली. ही संपूर्णपणे चांद्र पद्धत आहे. हिंदू दिवसाच्या अगदी विरूद्ध असलेला इस्लामी दिवस हा सूर्यास्तानंतर सुरू होतो.

शुहूर सन हा हिजरी वर्षतील ऋतुमानाच्या अभावामुळे सुरू झाला. सारा व उत्पन्न मोजण्यासाठी हिजरीचा उपयोग करता येत नसे तिथे शुहुर सन वापरला गेला.

फसली पद्धत सुद्धा त्याच्या नावाप्रमाणे फसल किंवा शेतीतून झालेल्या उत्पन्न मोजणीसाठी तयार केली गेली.

इलाही पद्धत बादशाह अकबर याने ११ मार्च १५५६ रोजी सुरू केली. ही पद्धत सौर होती पण अकबरानंतर त्याच्या वापरात बदल झाले व मूळ हेतू गळून पडला.रोमन कालगणना

रोमन कालगणना प्रामुख्याने युरोपातील लोकांनी आपल्याकडे आणली व वापरली. त्यालाच आता सामान्य काळ (Common Era) नावाने ओळखले जाते. ह्या कालगणनेप्रमाणे एखाद्या वर्षाला ख्रिस्तपूर्व (BC) किंवा ख्रिस्ताब्द (AD) अशा प्रकारे मांडले जायचे. आता ह्यांना सामान्य काळ (CE) आणि सामान्यपूर्व काळ (BCE) असे म्हटले जाते. मध्ययुगीन काळात ह्या कालगणनेतही काही बदल झाले ज्यातून ज्यूलियन (जुनी)ग्रेगोरीयन (नवीन) पद्धती पुढे आल्या. ह्या पद्धतींबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी कृपया काळगणनेची जुनी व नवीन पद्धत हे पान पहा.

जन्या व नवीन पद्धतीच्या दिनांकांमधील अंतर सतराव्या शतकात (१८ फेब्रुवारी १७०० पर्यंत) १० दिवस येते, आठराव्या शतकात (१७ फेब्रुवारी १८०० पर्यंत) ११ दिवस इतके येते व एकोणिसाव्या शतकात (१६ फेब्रुवारी १९०० पर्यंत) १२ दिवस इतके भरते.